- मयुरी चव्हाण
कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला पूल म्हणजे डोंबिवलीतील कोपर पूल! गेल्या दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अनेक महिन्यांपासून नवीन कोपर पूलाच्या तारखा दिल्या जात होत्या. अखेर हा तारखांचा सिलसिला आता संपल्यात जमा असून गणेश चतुर्थीच्या अगोदर हा पूल खुला केला जाणार असून या पुलावरून बाप्पाचं आगमन होणार, असा विश्वास केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
'लोकमत'ने पुलाच्या कामाचा आढावा घेतला असता रंगरंगोटी व डांबरीकरणाचे देखील काम पूर्ण झाले असून केवळ सीलकोट टाकण्याचे काम बाकी राहीले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोपर उड्डाणपूलाचा 'श्री गणेशा' होऊ शकतो. केडीएमसीच्या अखत्यारीतील पूल हा सुरूवातीला साडे सात मीटर अरुंद होता. नवीन पूल हा 10 मीटर अरुंद करण्यात आला आहे. रेल्वेच्या हद्दीत मोडणारा पूल रेल्वेच्या नियमानुसारच बांधण्यात आला आहे. या पुलांची बांधणी 1979 साली करण्यात आली होती.
सप्टेंबर 2019 रोजी कोपर पूल धोकादायक झाल्याचे सांगत रेल्वेकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जुना पूल हा झिक्झॅक आकारामध्ये होता. आता नविन पुलाची रचना बदलण्यात आली असून त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून वक्राकार देण्यात आला आहे. तसेच भविष्यात पुलाला बाजूला दुचाकी आणि रिक्षांसाठी स्लिप रोड बांधता यावा म्हणून विशिष्ट जागाही सोडण्यात आली आहे.
गुरुवारी पावसाने काहीसा दिलासा दिल्यामुळे कोपर पुलावर डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. रोड मार्किंग आणी शेवटचा हात म्हणून केवळ सीलकोट टाकण्याचे काम बाकी आहे. डोंबिवली पूर्व - पश्चिमेला जोडणारा कोपर पूल हा वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. सध्या पूर्व -पश्चिम प्रवास करण्यासाठी नागरिकांना एकमेव असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलावरून दोन किलोमीटरचा फेरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी पूर्वी हा पूल खुला केला जावा अशी मागणी जोर धरू लागली होती. बाप्पाचे आगमन या पुलावरुच होणार असा ठाम विश्वास केडीएमसी प्रशासनाकडून व्यक केला गेल्यानं गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन?कल्याण डोंबिवलीमधील पूल आणि त्याभोवती रंगणारा राजकीय पिंगा हा नागरिकांसाठी काही नवीन नाही. सध्या राजकीय पक्षांकडून या पुलाची पाहणी केली जात आहे. मात्र पुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना नियम मोडले म्हणून नागरिकांवर कारवाई करणारे पालिका प्रशासन उद्घाटन सोहळ्यात नेमकी काय भूमिका बजावते? ते देखील पाहावं लागणार आहे.