कल्याण : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजीपासून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यावेळी रोजी बंद ठेवली तरी रोटी बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे जाहीर केले होते. मात्र जुलै महिन्या उजाडला तरी रिक्षा चालकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँकेच्या अॅपमध्ये त्रूटी आहेत. त्याचा फटका रिक्षा चालकांना सहन करावा लागत असल्याने रिक्षा चालकांच्या मदतीची रक्कम व्याजासह जमा व्हावी अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
भाजप वाहतूक संघटनेच्या वतीने आज रिक्षा चालकांनी त्याची व्यथा मांडण्यासाठी माजी आमदार पवार यांच्या कार्यालया धाव घेतली. यावेळी पवार यांनी उपरोक्त मागणी केली. रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार होते. त्यासाठी ज्या बँकेला हे काम दिले गेले आहे. त्या बँकेने तयार केलेले अॅप हे चुकीचे आहे. त्यात त्रुटी आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी कागदपत्रंची पूतर्ता करुन देखील त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. साडे सात लाख रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपये मिळणार होते. साडे सात लाख रिक्षा चालकांच्या रक्कमेवरील व्याजही वाढले असेल. ते व्याजही रिक्षा चालकांना देण्यात यावे. व्याजासह ही रक्कम दिली जावी अशी मागणी पवार यांनी सरकारकडे केली आहे.
भाजप वाहतूक संघटनेचेय अध्यक्ष विल्सन काळकुंड यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करीत आहे. संघटनेचे पदाधिकारी वाल्मीक सोनार यांनी सांगितले की, रिक्षा चालकांनी कागदपत्रंची पूर्तता केली असता त्यात आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसल्याच्या त्रुटी दाखविल्या जात आहेत. काहींच्या नावाची माहिती चुकीची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात अधिकृत नोंदणीकृत रिक्षा चालकांची सर्व प्रकारची माहिती कागदपत्रंसह आरटीओ कार्यालयाकडे असते. रिक्षा चालकांच्या नावाची कागदपत्रंची शहानिशा आरटीओकडे झालेली आहे. त्याच माहितीचा आधार घ्यावा. रिक्षा चालकांना मदत देऊन मोकळे करावे.