डोंबिवली : डोंबिवलीएमआयडीसीमध्ये गेल्याच महिन्यात अंबर केमिकल कंपनीत रिएक्टर स्फोटाची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता बुधवारी पुन्हा येथील इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने त्या शाळेचे विद्यार्थी आणि येथील परीसरात असलेल्या नागरिकांत घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत स्फोट झाला आणि आगीची घटना घडली. यानंतर कंपनीतील कामगारांनी एकच पळ काढला असून वातावरण तंग झाले आहे. दरम्यान, पुन्हा काळ्या धुराने डोंबिवली शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच केमिकल कंपन्या हटवायची मागणी होत असताना आगीचे सत्र थांबत नसल्याने भयाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे एमआयडीसीचे रहिवासी दडपणाखाली आहेत.
दरम्यान, सोशल मोडियावर क्षणात व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याने विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढले असून जिथे घटना घडली, तिथे कोणी अडकले आहेत की नाही याची माहिती मिळू शकत नाही आहे. पण तरी कामगार देखील घाबरले आहेत असे दिसून येत आहे. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा पोहोचली असून आग शमवण्याचे कार्य सुरू झाले आहे.
इंडो अमाईन कंपनीला आग लागली आहे, आग विझवण्याचे काम सुरू असून घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व यंत्रणा कार्यरत झाल्याने मदतकार्य सुरू झाले आहे, मी स्वतः घटनास्थळी आहे. - भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना, आणि उद्योजक