डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीला गुरुवारी दुपारी तीन वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर प्लास्टिकचे गोडाऊन असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात काळ धुराचे लोट पसरले होते .ऐन दुपारच्या वेळेस रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. (Fire at Lakshmi Niwas building in Dombivali)
केडीएमसी प्रशासनाने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. मात्र या इमारतीमधील काही दुकाने सुरू होती. आग लागल्याचे समजताच दुकानदारांनी दुकानं बंद करून पळ काढला. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आजूबाजूच्या इमारतीमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दुसरा मजल्यावर काही दुकानदारांनी ,फेरीवाल्यानी आपला माल ठेवला होता याच मालाला आग लागली मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.