डोंबिवली: येथील पूर्वेकडील पाटकर रस्त्यावरील सरोज आर्केड या टॉवर इमारतीच्या मीटर केबिनला शनिवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आणि रात्र-दिवस गजबजाट असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण, कल्याण डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान आणि २ फायरवाहन दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे महावितरण, अग्निशन दल विभागातून सांगण्यात आले.
महावितरणचे अधिकारी संतोष बोकेफोडे यांनी सांगितले की, घटना घडल्याचे समजताच महावितरणचे कर्मचारी तेथे गेले त्यानी सुरक्षिततेच्या कारणावरून तातडीने वीजपुरवठा खंडित केला. अल्पावधीत आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आली, त्यानंतर आता संबंधित घटनेची विद्युत निरीक्षक, ठाणे येथून अधिकारी येतील ते पाहणी करतील, आणि त्यानंतर आग नेमकी कशी लागली असू शकते याची कारणमीमांसा स्पष्ट होईल. मात्र तो पर्यंत त्या इमारतीच्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित राहील, त्या निरीक्षकांना घटनेबाबत कळवण्यात आले आहे.
सुमारे २८,३० मिटर त्या ठिकाणी असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले, त्याबाबतही चौकशी सुरू असून माहिती घेण्यात येत आहे. पण या घटनेमुळे तेथील व्यावसायिक, रहिवासी भयभीत झाले असल्याने माहिती संकलित व्हायला काहीसा वेळ लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीच्या ठिकाणी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ, फोटोमध्ये एक जनरेटर दिसून येत असून नेमकी आग कशामुळे लागली याबाबत तपासणी करण्याचे काम विविध शक्यतांच्या आधारे करण्यात येऊ शकते, अशीही चर्चा घटनास्थलावरुन जाणाऱ्या वाटसरू नागरिकांमध्ये सुरू होती.