डोंबिवली : येथील एमआयडीसी फेज १ मधील शक्ती प्रोसेस या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता भीषण आग लागली होती. यात सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात कंपनीतील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा कापडाचा माल आगीत भस्मसात झाला आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.शुक्रवारी कंपनी बंद होती. परंतु कंपनीत देखभाल दुरूस्तीचे काम चालू होते. दरम्यान, आग लागताच देखभाल दुरूस्तीचे काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. त्यामुळे कामगार थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कंपनीत मोठ्या प्रमाणात कापडाचे गठ्ठे होते. या गठ्ठ्यांमुळे आगीने भीषण रूप धारण केले. चार मजली कंपनीत आग मोठया प्रमाणात पसरल्याने डोंबिवलीसह कल्याणमधील सहा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. पाण्याचे टँकरही मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले होते. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका मशीनमध्ये स्पार्क झाला आणि कापडाच्या गठ्ठ्यांनी पेट घेतला असेही बोलले जात आहे. या आगीत एक अग्निशमन कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे अधिकारी, पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, कामा संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते.चार वर्षांतील दुसरी घटनाखंबाळपाडा परिसरातील कल्याण रोडला असलेल्या या कंपनीला आग लागण्याची ही गेल्या चार वर्षातील दुसरी घटना आहे. २९ नोव्हेंबर २०१७ रोजीही या कंपनीला आग लागल्याची घटना घडली होती. एकिकडे सोनारपाडा परिसरातील गोदामाला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्याच्या घटना ताजी असतानाच कंपनीला लागलेल्या आगीने एमआयडीसी आणि परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत कापडाच्या कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 1:27 AM