मुरलीधर भवार, डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी प्रथमच फ्लाेटिंग जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. त्याची व्यवस्था डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडीनजीकच्या गणेश विसर्जन घाटावर करण्यात आली आहे. माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी या फ्लोटिंग जेट्टीची व्यवस्था केली आहे.
या विषयीची अधिक माहिती देताना म्हात्रे यांनी सांगितले की, मोठा गाव खाडीवर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले जाते. लहान मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती असताता. या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी यापूर्वी तराफ्याची व्यवस्था केली जात होती. मात्र एकाच वेळी अनेक गणेश मूर्ती तराफ्यावर ठेवून खाडीत विसर्जनासाठी नेणे शक्य होत नव्हते. तसेच जास्त गणेश मूर्तींचा भार तराफा पेलू शकत नव्हता. खाडीत भरती ओहोटी असते. तसेच खाडीचे पाणी वाहते आहे. या सगळ्या गोष्टी पाहता मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत फ्लोटींग जेट्टीचा प्रयोग करण्याचा विचार होता. त्यानुसार फ्लोटींग जेट्टी मागविण्यात आली आहे. ती मोठा गाव खाडी येथील गणेश घाटावर आज कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही फ्लोटिंग जेट्टी १० टनाची आहे. गणेश मंडळासह घरगूती मूर्ती विसर्जन करणे या जेट्टीमुळे सोयीस्कर होणार आहे. तसेच विसर्जनासाठी कमी वेळ लागणार आहे.