कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राज्यातील पहिले कुष्ठरोग रुग्णालय उभारले जात आहे. हे रुग्णालय एप्रिल अखेर्पयत बांधून पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. आज जागतिक कुष्ठरोग निर्मलून दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील हनुमान कुष्ठरोग वसाहतीला आयुक्तांनी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आयुक्त सहभागी झाले.
या प्रसंगी कुष्ठरोग वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, सरकारी अधिकारी मंगेश खंदारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, माजी नगरसेवक कैलास शिंदे, नगरसेविका रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्तांनी सांगितले की, महापालिका हद्दीत कुष्ठरोग सव्रेक्षणात यावर्षी १६ नवे कुष्ठरोग रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४ रुग्ण हे विकृत आहे. त्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. या ठिकाणी कुष्ठरोग्यांसाठी उभारले जाणारे १४ खाटांचे रुग्णालय एप्रिल अखेर्पयत पूर्ण होणार आहे. कुष्ठरुग्णांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील.
सामाजिक कार्यकर्ते माने यांनी सांगितले की, हनुमाननगर कुष्ठरोग वसाहती ही १९७८ सालापासून आहे. वसाहतीची लोकसंख्या ४७७ आहे. त्याठिकाणी ११० कुष्ठरोगी आहेत. याठिकाणी रुग्णालय उभे करण्याची मागणी १९९८ साली करण्यात आली. तत्कालीन महापौर कल्याणी पाटील यांच्या कार्यकाळात माजी नगरसेवक कैलास शिंदे यांच्या मागणीनुसार ५० लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.