कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शीळ फाटा रोडवरील मानपाडा पोलीस स्टेशन, गोळवली गाव या परिसरात मुसळधार पावसाने पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. विशेषतः 109 प्रभागातील गोळवली गाव परिसरात गेल्या 40 वर्षांत कधी साचले नाही, असे पाणी रविवारपासून साचले आहे.
कल्याण शीळ फाटा रस्त्याचे काम एमएसआरडीसीने केले आहे. मात्र रस्त्याचे काम करताना एमएसआरडीसीने पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या लहान मोठ्या मोऱ्या बुजविल्या. काही नालेही बुजविले गेले. याबाबत एमएसआरडीसीकडे वारंवार तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र त्याची संबंधित मंत्रालयाने दखल घेतली नाही, अशी माहिती प्रभाग क्रमांक 109 गोळवली वॉर्डचे भाजपचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी लोकमतला दिली. या चार गावांतील पाणी जाण्यासाठी एमएसआरडीसीने रस्ता बांधताना काळजी घेतली नाही, असेही पाटील यांनी सांगितले. नगरसेवक म्हणून मी वारंवार पाठपुरावा करत आहे, असे ते म्हणाले. मात्र अधिकारी दाद देत नाहीत, असे ते म्हणाले.
गोळवली गावाजवळ कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यात काल पावसाचे पाणी शिरले होते, असेही पाटील म्हणाले. या भागात 40 वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील नाल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी पाटील यांनी केली अाहे.