कल्याण : दोन आठवड्यांपासून अत्यंत गंभीर तब्येत असलेल्या नीलम देशमुख (७८, रा. नाशिक) यांच्यावर येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे पार पडलेल्या ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक नवा जन्म मिळाला आहे. फोर्टिस हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट-इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी डॉ. विवेक महाजन व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेला मिळालेले यश हे वैद्यकीय आघाडीवर कल्याणसाठी एक महत्त्वाचे यश आहे.
देशमुख यांना शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, थोड्याफार श्रमांनीही छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. नाशिक येठ्ठील रुग्णालयात त्यांच्या अनेक चाचण्या करून घेण्यात आल्या; त्यांचा अँजिओग्राम नॉर्मल आला. पण टूडी एकोकार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदय थकले होते व कमकुवत झाले होते. यालाच हृदयातील डावे नीलय निकामी होणे असेही म्हणतात.
शरीराभर अपुरे रक्ताभिसरण होत असल्याने रुग्णाला कमी रक्तदाबाची समस्या सतत जाणवत होती. याचा त्यांच्या किडन्यांवर विपरित परिणाम झाला होता. त्यांची तब्येत वेगाने ढासळत होती. अशा परिस्थितीत त्यांना पुढील उपचारांसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आओर्टिक व्हॉल्व्हमध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आणि डावे नीलय निकामी झाल्याने फुफ्फुसामध्ये रक्त साठत होते व त्याला सूज आली होती, ज्याच्या परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती आणि त्यांना प्रचंड धाप लागत होती. आओर्टिक स्टेनॉसिसची समस्या दूर करणे अत्यावश्यक असल्याने ओपन हार्ट सर्जरी आणि शरीराचा कमीत-कमी छेद घेऊन करण्यात येणारी तावी शस्त्रक्रिया असे दोन पर्याय डॉ. महाजन यांनी रुग्णाच्या कुटुंबियांसमोर ठेवले.
रुग्णाच्या स्थितीमधील गुंतागूंत लक्षात घेता ओपन सर्जरीच्या तुलनेत तावी प्रक्रियेमध्ये कमी जोखीम होती. यावेळी नवी झडप बसवली गेली नसती तर रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता होती.याबाबत डॉ. विवेक महाजन यांनी सांगितले की, रुग्णाला अनेक गुंतागूंतीच्या समस्या होत्या व आम्हाला शस्त्रक्रियेआधी व शस्त्रक्रियेदरम्यान अनेक आव्हाने सामोरी आली. त्यांना पूर्वी स्ट्रोक येऊन गेला होता, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळासाठी वास्तव्य करावे लागले होते. ज्याचा परिणाम रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला होता. त्यांची मन:स्थिती स्थिर नव्हती. तावी प्रक्रियेनंतर दोन दिवसांनी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला. दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे हृदय नीट काम करू लागले कारण आता नवीन व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून पम्प होणारे रक्त विविध अवयवांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा येत नव्हता.
किडनीच्या अकार्यक्षमतेची समस्याही सोडविण्यात आली आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेले रक्त काढून टाकण्यात आले. अनेक गुंतागूंतीच्या समस्या असलेल्या या रुग्णाला TAVI प्रक्रियेमुळे एक नवा जन्म मिळाला, ज्यांच्यासाठी ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय बऱ्यापैकी धोकादायक ठरू शकला असता. तावी ही आओर्टिक स्टेनॉसिसने गंभीररित्या आजारी रुग्णांसाठी, विशेषत: ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये मृत्यूचा व गुंतागूंतीचा धोका लक्षणीयरित्या अधिक असल्यास चांगला पर्याय ठरू शकणारी एक सुरक्षित आणि प्राणरक्षक प्रक्रिया असल्याचेही डॉ. महाजन यांनी सांगितले.
फॅसिलिटी डिरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या की, वैद्यकीयदृष्ट्या मैलाचा टप्पा ठरू शकेल अशा या शस्त्रक्रियेमधून नेहमीच्या प्रक्रियांच्या सोबतीनेच गुंतागूंतीच्या, जीव वाचविणारे हृदयोपचार पुरविण्यासाठी आम्ही करत असलेल्या कार्याची खोली दिसून आली व यामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील रुग्णांना अशाप्रकारची सेवा देणे आम्हाला आता शक्य आहे. रुग्णाचे पुत्र निलेश म्हणाले की, माझ्या आईच्या वैद्यकीय पूर्वतिहासामुळे आणि तिच्या तब्येतीमधील गुंतागूंतींमुळे आम्ही तावी प्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. तिला आता चालता येते व ती बरी आहे.