कल्याण: कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावानजीक असलेल्या एका दगड खाणीत पाण्यात पडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईने या पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे, याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड, त्यांची सून अपेक्षा गायकवाड, नातू मोक्ष, निलेश आणि मयुरेश हे पाचही जण दगड खाणीतील पाणवठ्यावर सायंकाळी कपडे घेण्यासाठी आले होते. या पाचही जणांचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. पाचही जणांचे मृतदेह रात्री आठ वाजेपर्यंत शोधून काढले. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या ठिकाणी शोध कार्यासाठी मदत करणाऱ्या एका ग्रामस्थाने अशी माहिती दिली की खदान येथील पाण्यावर ठिकाणी गायकवाड कुटुंब कपडे धुण्यासाठी आले होते. ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यामुळे हे कुटुंब याठिकाणी आले होते. पाण्यामुळे पाच जणांचा बुडून. मृत्यू झाला आहे . ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बाब आहे. आता तरी प्रशासनाने डोळे उघडून या भागातील पाणी समस्या सोडवावी अन्यथा प्रशासनात अजून किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.