डोंबिवली: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला विधीमंडळाने मंजूरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. दरम्यान त्याचे स्मरण करुन देण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क आगरी भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले आगरी भाषेतील पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. विधी मंडळात २५ ऑगस्ट २०२२ ला दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विधी मंडळाने मंजूर केलेला ठराव अद्याप केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना आगरी भाषेत दिलेल्या पत्रात मनसेचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री आपण नेहमी दिल्लीत जातात. आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही. ‘भरले गारीला सूप जर नसंत’ अशा शब्दात त्यांनी आगरी म्हणीचा वापर करुन लक्ष वेधले आहे.
समाज बांधव विमानतळाच्या ठिकाणी दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लागावी असे स्वप्न पाहत आहेत. ज्या समाज बांधवांनी मोठे जन आंदोलन उभे केले. त्याच बांधवांच्या मनात दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्याने विस्तव पेटू शकतो. त्यामुळे ‘हात्ती गेला अन शेपूट रला’ अशी म्हण वापरत मुख्यमंत्र्यांना नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची आठवण पत्रप्रपंचाद्वारे पाटील यांनी केली आहे.