कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेस सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरीकांची गर्दी होती. ही गर्दी टाळण्याकरीता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेस पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या विविध लसीकरण केंद्रावर अनेकदा लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित ठेवण्यात येतो. त्यामुळे चार पाच दिवसांनी लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरीकांची एकच गर्दी होते. या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरु करण्याचे धोरण महापालिकेने जाहिर केले असले तरी त्या मानाने खाजगी रुग्णालयांना सूद्धा लस उपलब्ध होत नाही. त्याठिकाणीही गर्दीच आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लस मिळत नाही. गर्दी टाळण्यासाठी लसीकरण घरोघरी जाऊन करण्यात यावे. त्यामुळे गर्दी होणार नाही. तसेच सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडणार नाही. सोशल डिस्टसींग पाळले जाईल. याकडे प्रशासनाचे माजी नगरसेविका धात्रक यांनी लक्ष वेधले आहे.