कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेने अ प्रभागात स्वच्छते संदर्भात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपच्या महिला कमळाची निशाणी लावून आाल्याने शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने कमळ लावण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला. संतप्त झालेल्या भाजप महिला पदाधिकारी या आक्रमक झाल्या त्यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात आंदोलन केले. नगरसेवकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी कमळाचे चिन्ह लावल्याने त्याला माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी आक्षेप घेतला. महिलांना कमळाचे चिन्ह काढण्यास भाग पाडले. या कार्यक्रमात भाजपच्या मनिषा केळकर यांच्यासह अन्य महिलाही सहभागी झाल्या होत्या. नगरसेवकांनी असा प्रकार केल्याने भाजप महिला आघाडी आक्रमक झाली. नगरसेवक पाटील यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी करीत आज खडकपाडा पोलिस ठाण्यात आंदोलन केले.
या वेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधर यांच्यासह माजी उपमहापौर, उपेक्षा भोईर, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शक्तीवान भोईर आदी सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्षा चौधरी यांनी सांगितले की, आपण हिंदूत्वासाठी एकत्रित आलो आहोत. तर युती धर्म पाळला पाहिजे. पक्षाचे चिन्ह काढण्यास सांगणे हा आमच्या पक्षाचा आणि युतीचा अवमान आहे. त्यामुळे पाटील यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी.
या प्रकरणी दुर्योधर पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम महापालिकेचा होता. त्यात पक्षाचा काही एक संबंध नव्हता. मी देखील कार्यक्रमाला गेलो. त्याठिकाणी मी पक्षाच्या चिन्हाचा वापर केला नाही. ही बाब अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिली. महिलांसोबत वाद घातला नाही. काही चुकीचे कृत्य केलेले नसताना मला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.