कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी असलेल्या सखल भागातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. नदी व खाडी किनारी असलेल्या डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकूर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधूनी नजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासगर, वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, वीजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले आले.
आधीच कोरोनामुळे मेटाकूटीला आलेले नागरीकांचे घर संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. सव्रेक्षण करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी पावसामुळे घरांचे नुकसान झले असले तरी यापूढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्या येत आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.
कल्याण डोंबिवली शहराला 2019 साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आाली होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ 30 टक्के लोकांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती. उर्वरीत 70 टक्के नागरीकांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. ही नुकसान भरपाईची रक्कम आणि आत्ता झालेल्या नुकसानीची रक्कम दिली जावी याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.