कल्याण: एकिकडे अनधिकृत बांधकामांचे प्रस्थ वाढत असताना एका बांधकामावर कारवाई करणा-या अधिका-याला माजी नगरसेवकाने प्रभाग कार्यालयाच्या बाहेर मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी 12 च्या दरम्यान घडली. मारहाण करणारे मुकुंद कोट शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. मारहाण प्रकरणी अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुकुंद कोट यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मनसेच्या माजी नगरसेविका सुनंदा कोट आणि अन्य दहा ते बारा जणांविरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणणो असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सावंत यांच्याकडे अ प्रभागासह आय प्रभागाची देखील जबाबदारी आहे. अ प्रभागक्षेत्रातील मोहने येथील एका बांधकामा विषयी उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार सावंत सकाळी त्या बांधकामावर कारवाई करून प्रभाग कार्यालयात परतले. मात्र बांधकामाच्या ठिकाणी जुने गावदेवीचे मंदिर होते. ते मोडकळीस आल्याने ते तोडण्यात आले होते. नव्याने मंदिर बांधण्यासाठी जोताचे बांधकाम चालू होते ते अनधिकृत नाही असा दावा करीत काही ग्रामस्थांसह माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी अ प्रभाग कार्यालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत मनसेच्या माजी नगरसेविका आणि त्यांच्या पत्नी सुनंदा कोट देखील होत्या. सावंत यांनी कारवाई केल्याच्या रागातून कार्यालयाच्या बाहेरच मुकुंद यांनी त्यांच्या कानशिलात लगावली.
या झालेल्या प्रकाराने त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. सावंत यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान माजी नगरसेविका कोट यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे माफिनामा सादर केला. परंतू आयुक्तांनी माफिनामा धुडकावित गुन्हा दाखल करण्याचा पवित्र घेतला.