प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगारातील बस जळीत प्रकरणात चौघा कर्मचा-यांना निलंबित केले आहे तर सात जणांना सक्त ताकीद दिली आहे. आगीच्या घटनेच्या दिवशी विना परवानगी रजेवर जाणे आणि कार्यालयीन वेळेच्या आधीच कार्यालय सोडल्याप्रकरणी चौघांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक डॉ दीपक सावंत यांनी दिली.
गणेश घाट आगारातील रॅम्पवर उभ्या असलेल्या दोन बस लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना ८ डिसेंबरला घडली होती. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला गेला असताना याप्रकरणी झालेल्या चौकशीअंती चौघांना निलंबित करण्यात आले आहे. कारागीर तथा प्रभारी कार्यशाळा प्रमुख सुभाष साळुंखे, कारागीर राजेश कारळकर, सहाय्यक वाहतूक निरिक्षक मनीष काळे, मुळचे चालक असलेेले परंतू सध्या प्रभारी सुरक्षारक्षक असलेले सुखदेव कश्यप अशी चौघा निलंबित कर्मचा-यांची नावे आहेत. ज्या दिवशी दोन बस जळाल्याची घटना घडली त्यादिवशी सुरक्षारक्षक कश्यप परवानगी न घेता गैरहजर होते. तर कार्यशाळा प्रभारी प्रमुख साळुंखे विना परवानगी रजेवर होते. कारागीर कारळकर आणि सहाय्यक वाहतूक निरिक्षक काळे यांनी कार्यालयीन वेळ पूर्ण होण्यापुर्वीच कार्यालय सोडले होते असे चौकशीत उघड झाल्याने चौघांना निलंबित केल्याची माहिती महाव्यवस्थापक सावंत यांनी दिली.
सात जणांना सक्त ताकीद
चौघांवर निलंबनाची कारवाई केली असताना जे आग लागल्यावर घटनास्थळी हजर होेते त्या सात जणांना सक्त ताकीद दिली गेल्याचे सावंत यांनी सांगितले.
संबंधित कारवाई अन्यायकारक
आगीच्या घटनेची सखोल चौकशी केली असता खरे कारणं समोर आले असते. परंतू वस्तुस्थिती वेगळी असताना कर्मचा-यांना निलंबित करणे अन्यायकारक आहे. निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल - रवि पाटील, अध्यक्ष, परिवहन कामगार कर्मचारी संघटना, कल्याण