डोंबिवली : पोलीस दलात ओळख असल्याचे सांगत भावाचे पोलीस भरतीत काम करून देण्याचे प्रलोभन दाखवत बहिणीची १ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच बहिणीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
डिझायनर असलेल्या स्वाती भाकरे (३१, रा. मिलापनगर, डोंबिवली) यांची अरविंद अशोक निकम (३६) सोबत खंबाळपाडा येथे ओळख झाली. ओळखी दरम्यान अरविंद याने पोलीस मित्र संघाचे ओळखपत्र व आरोग्य सेवा, मंत्रालय येथील वरिष्ठ लिपीक ओळखपत्र दाखवले. स्वाती यांचा विश्वास संपादन करत पोलीस दलात ओळख असल्याची बतावणी केली. तसेच, स्वाती यांच्या भावाचे पोलीस भरतीमध्ये काम करून देण्याचे आश्वासन दिले. अरविंदच्या बोलण्यावर विश्वास ठेवत स्वाती यांनी १० मार्च ते २१ मार्च दरम्यान ऑनलाईनच्या माध्यमातून ८१ हजार सातशे रुपये तसेच, लोनच्या माध्यमातून ५५ हजार रुपये किमतीचा मोबाईल खरेदी केला. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे स्वाती यांच्या लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अरविंदविरोधात गुन्हा दाखल केला.