कल्याण: कल्याणडोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपुर महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापुर नगरपरिषद यांच्यासाठी एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला काल राज्य सरकारने मान्यता दिली. त्या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखडं यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे आज रात्री १२ वाजल्यापासून केडीएमटीच्या बसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के सवलत हा महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला.
राज्य सरकारच्या एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या निर्णयानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ (केएमपीएमएल) स्थापन करण्यात आले. या गठीत केलेल्या मंडळाची पहिली बैठक आज केडीएमसीच्या आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ इंदु राणी जाखडं यांच्या अध्यक्षतेखाली ( दूरदृश्य प्रणालीद्वारे ) आयुक्तांच्या दालनात पार पडली. या बैठकीला उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, केडीएमटीचे व्यवस्थापक डॉ दीपक सावंत तसेच आरटीओचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कल्याण परिवहन महामंडळाच्या संपूर्ण रचना व कार्यपध्दतीबाबत संचालक मंडळाला माहिती देण्यात आली व या मंडळामार्फत पुढील नियोजन व धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निश्चित करण्यात आले.
संचालक मंडळात यांचा अंतर्भाव राहणार
कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपुर महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापुर नगरपरिषद यांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, आरटीओ, एमएमआरडीएचे प्रतिनिधी, सीआयआरटी पुणेचे संचालक यांचा अंतर्भाव राहणार आहे.