डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात लसींचा तुटवडा असल्यानं वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. कोरोना काळात आर्थिक टंचाई निर्माण झालेले गरीब-गरजू लोक पैसे भरून खाजगी लसीकरण केंद्रातून लस घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन याअगोदर मनसेनं रिक्षाचालक, नाभीक, घरकाम करणाऱ्या महिला व इतर गरजु घटकांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम राबवली होती. आता पुन्हा जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण करण्यात आले.
मोफत लसीकरण करून मनसेने नागरिकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेने मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण कार्यक्रम घेत खऱ्या अर्थाने "करून दाखवले" असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या लसीकरण कार्यक्रमात कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, मालाड आदी परिसरातील 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.
राज्य सरकारने, अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत लसीकरणासाठी आलेल्या फोटोग्राफर्सनी व्यक्त केले. फोटोग्राफर्ससाठीसुद्धा अशाप्रकारचे आयोजन केले गेल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आहे. येत्या काळात गरजूंसाठी अशाच प्रकारे उपक्रम राबवणार असल्याचा मानस मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.