मुरलीधर भवार, कल्याण- शहराच्या पूर्व भागातील होम बाबा टेकडी परिसरात एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना काल संध्याकाळी घडली. राहुल गगे असे जखमी तरुणाचे नाव आहे. राहुल आई सोबत नेहमी भांडण करत असल्याच्या या रागातून राहुलच्या वडिलांच्या मित्राने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार करणाऱ्या देबाशीष बंक या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
राहुल गगे आपल्या कुटुंबासह कल्याणमधील बापगाव परिसरात आपल्या आई आणि दोन बहिणीसह राहतो. राहुलचे वडील एका गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. राहुलचे त्याच्या आईसोबत नेहमीच वाद होत होता. त्या वादातून राहुल आईला मारहाण देखील करायचा. ही बाब राहुलच्या वडिलाचा मित्र देबाशीष बंक याला कळताच तो संतापला. त्याने राहुलला गाठून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे अपहरण करुन त्याला मुरबाड येथील जंगलात नेले.
त्यानंतर पुन्हा त्याला कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी परिसरातील निर्जन स्थळी आणले. त्याच्यावर छऱ््याच्या बंदुकीने गोळीबार केला. बंदुकीतून निघालेले छर्रे राहुलच्या कमरेत लागल्याने राहुल गंभीर जखमी झाला. राहुल तेथून निसटला त्याने रुक्मीणीबाई रुग्णालय गाठले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.