कल्याण : दिल्लीत संसद अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात कल्याण यार्ड पुनर्विकासाबाबतचा मुद्दा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा, याकरिता अनेक प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा मंजूर करुन घेतले, त्यापैकी कल्याण यार्ड पुनर्विकास (रिमॉडेलिंग) हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी साधारणपणे ८०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील या कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून अद्यापी या प्रकल्पाचे कोणतेही काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले नाही. लाखो रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या या प्रकल्पाचे काम निधीच्या अभावी काम सुरु होत नसल्याची माहिती सभागृहात देत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लवकरात लकवर निधीची उपलब्धता करावी आणि सदर प्रकल्पाचे काम वेळेच्या मर्यादेत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवून गतीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरील कल्याण स्थानक हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त जंक्शनांपैकी एक असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मिळून ७६० गाड्या दररोज कल्याण रेल्वे स्थानकात थांबतात. क्रॉस ओव्हर आणि मर्यादित रेल्वे मार्गिकांमुळे गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा सुरू होण्यास बराच विलंब होतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
कल्याण यार्डच्या पुनर्विकासामुळे कल्याण जंक्शनची पुनर्बांधणी होणार असून या अंतर्गत नवीन रेल्वे मार्गिका तसेच अतिरिक्त ५ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून एकूण १२ प्लॅटफॉर्म होणार आहेत. रेल्वे माल वाहतूक सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी गाड्या यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, ८०० कोटींच्या या कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून अद्यापपर्यंत कोणतेही काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले नसून निधीच्या अभावी काम सुरु होत नसल्यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करावी आणि सदर प्रकल्पाचे काम वेळेच्या मर्यादेत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवून गतीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी सभागृहात केली. भविष्यात प्रगत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह कल्याण स्थानकाचा विकासामुळे नागरिकांचा रेल्वे प्रवास सोयीस्कर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.