कल्याण: गावठी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दुर्गेशकुमार वारे ( वय २२) याला सापळा लावून उल्हासनगर शहरातून अटक केली. वारे विरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली की उल्हासनगर नं. ३ येथील शांतीनगर, मोहटादेवी जगदंबा मंदिराजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तुल घेऊन काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याकरीता येणार आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन वाजता वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्यासह पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, गोरक्ष शेकडे आदिंच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून दुर्गेशकुमारला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस असा ३१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळुन आला.
चौकशीअंती उद्देश समोर येईलदुर्गेशकुमारची पार्श्वभूमी काय आहे? त्याने कोणासाठी गावठी पिस्तूल बाळगले होते. तो कोणता गंभीर गुन्हा करणार होता. याबाबत वरीष्ठ पोलिस निरक्षक पवार यांना विचारले असता रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दुर्गेशकुमारला हजर केले जाईल. पोलिस कोठडी मिळाल्यावर त्याची चौकशी केली जाईल. यात गावठी पिस्तूल कशासाठी बाळगले होते, उद्देश काय होता हे समोर येईल असे पवार म्हणाले.