मुरलीधर भवार, कल्याण: शहरातील पूर्व भागातील हनुमानगारतील कुष्ठरुग्ण वसाहतीत कुष्ठरुग्णांच्या उत्थानासाठी काम केल्याबद्दल केंद्र सरकारने गजानन माने यांच्या कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे. मात्र या पुरस्कारात माजी नगरसेवक कैलास शिंदे यांचे माेलाचे याेगदान असल्याची प्रांजळ कबूली पद्मश्री माने यांनी दिली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक शिंदे यांनी माने यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार आयाेजित केला हाेता. यावेळी पद्मश्री माने यांनी शिंदे यांच्या याेगदानाचा उल्लेख केला. हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीच्या विकासासाठी त्याना लागणाऱ्या साेयी सुविधा यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा माजी नगरसेवक शिंदे यांनी सातत्याने केला. तसेच विविध परीने सहकार्य केले. महापालिकेच्या महासभेत ठराव करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला हाेता. हा ठराव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविला हाेता.
याचा उल्लेख माने यांनी यावेळी केला. माजी नगरसेवक शिंदे यांच्या हस्ते माने यांचा शाळ श्रीफळ देऊन यथाेचित सत्कार करण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने गाैरविलेले माने हे कल्याण डाेंबिवलीकर आहेत. याचा सार्थ अभिमान असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.