कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील बारावे येथील कचरा ट्रान्सफर स्टेशनमुळे बारावे, गोदरेज हिल, वसंत व्हॅली, मोहन अल्टीझा या इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना त्रास होत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी मनसेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांची आज भेट घेण्यात आली.
मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह उपायुक्तांची भेट घेतली. नागरिकांना ट्रान्सफर स्टेशनचा त्रास होत आहे. त्यावर उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, ट्रान्सफर स्टेशनचे ठेकेदार यांना समन्स काढण्यात येणार आहे. ठेकेदाराला ताकीद दिली जाणार आहे. कचरा त्याठिकाणी डंप करण्यात येऊ नये. त्याने त्याउपरही ऐकले नाही तर त्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल. त्याच्या ऐवजी दुसरी एजेन्सी कामासाठी नेमली जाईल. याबाबत आयुक्तांसोबतही चर्चा केली जाईल असे आश्वासन मनसेला देण्यात आले. त्यानंतर येत्या सात दिवसात पुन्हा या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. डोंबिवली, टिटवाळा येथील कचरा प्रकल्प लवकर चालू करण्यात येतील. त्यामुळे बारावे याठिकाणी येणारा कचरा विभागाला जाईल असे ही आश्वासन या वेळी मनसेच्या शिष्टमंडळास दिले गेले असल्याची माहिती मनसेचे प्रभागाध्यक्ष सनील घेगडे यांनी दिली आहे.