कल्याण : तमिळनाडू येथे होणाऱ्या 19 ते 31 जानेवारी दरम्यान सहावी खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील गतका (भारतीय पारंपारिक युद्ध कला) खेळाडूंचा संघ तामिळनाडूमध्ये दाखल झाला आहे. या संघामध्ये इंडिव्हिज्युअल फरीसोटी- मंथन पवार, फरीसोटी टीम स्मित चौधरी, धनुष बाबू, अरमान मुजावर, इंडिव्हिज्युअल सिंगलसोटी धीरज कोट, इंडिव्हिज्युअल फरीसोटी वेदिका कवळे, फरीसोटी टीम हर्षदा चव्हाण, वर्तिका पाटील, सोनू कामी, इंडिव्हिज्युअल सिंगलसोटी जिज्ञासा पाटील या 10 खेळाडूंची निवड झाली आहे.
13 ते 18 जानेवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचालन यांच्याद्वारे शिबिराचे आयोजन केले होते. या संघाचे प्रशिक्षकपदी प्रा. आरती चौधरी आणि प्रा. सुरज गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या संघाचे मॅनेजर क्रीडा अधिकारी सचिन निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आणि उपसंचालक उदय जोशी तसेच असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्राचे सचिव प्रा. आरती चौधरी आणि इतर पदाधिकारी या सर्वांनी गतका संघाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा गतका संघ तामिळनाडूमधील मदुराई येथे स्पर्धेसाठी दाखल झाला असून 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणाऱ्या गतका स्पर्धेत हा संघ सहभागी होत आहे.