कल्याण: गत महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात खड्डे पडून कल्याण डोंबिवली शहरातील डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण केली आहे. पावसाने उघडीप देताच केडीएमसीकडून खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान रविवारी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दोन्ही शहरांचा दौरा करून खड्डे भरणी कामांची पाहणी केली. सूचनांचे पालन न करणा-या व कामात हलगर्जीपणा करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा सज्जड दम देताना दांगडे यांनी गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत आणा अशी ताकीद ही दिली.
आयुक्त दांगडे यांनी कल्याणमधील दुर्गाडी परिसर, डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल रोड, पंचायत बावडी रोड, डॉ राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा, शास्त्रीनगर रूग्णालय रोड, कल्याण ग्रामीणमधील द्वारली आदि भागातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, माहीती व जनसंपर्क विभागाचे प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, मनोज सांगळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. पावसाने उघडीप दिली असून येत्या आठवडाभरात डांबर, कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉक आदिंच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले जाईल, गेल्या आठवडयातच एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसी च्या अधिका-यांची बैठक घेऊन त्यांनाही त्यांच्या अखत्यारीतील रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले असल्याची माहीती दांगडे यांनी यावेळी दिली.
५० हजारांचा ठोठावला दंड
पाहणी दौ-यात आयुक्त दांगडे यांना एका खड्डे भरण्याच्या कामाच्या ठिकाणी महापालिकेचा लोगो आणि नाव असणारे जॅकेट कामगारांनी वापरले नसल्याबाबत संबंधित कामाच्या कंत्राटदाराला ५० हजारांचा दंड ठोठावला. खड्डे भरण्याच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणा-या आणि सूचनांचे पालन न करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.