कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेस धरणाची आवश्यकता आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी होऊ घातलेल्या कुशिवली धरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. हे काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी मी कल्याणकर आणि जागरुक नागरीक मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम आणि जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पत्रकार किरण सोनावणे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची याबाबत प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना या संदर्भात एक निवेदन सादर करुन त्यांच्यासोबत चर्चा केली. कल्याण डोंबिवली महापालिकेची स्वत:ची पाणी पूरवठा योजना आहे. मात्र महापालिकेच्या मालकीचे धरण नाही. महापालिका आजही उल्हास नदीतून पाणी उचलून त्यावर शुद्धीकरण करते. त्यानंतर नागरिकांची तहान भागविते. तसेच २७ गावे ही पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून आहेत. महापालिकेस पाण्याच्या मंजूर कोटय़ापेक्षा जास्तीचे पाणी उल्हास नदी पात्रतून उचलते. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता पाणी पुरवठा करण्यावर ताण येऊ शकतो.
महापालिका हददीतील वाढती लोकसंख्या, होणारे नवे बडे गृह प्रकल्प यांचा विचार करता नागरीकांना भविष्यात पाण्याची सोय व्हावी याकरीता धरणाची आवश्यकता आहे अशी मागणी निकम आणि घाणेकर यांनी केली आहे. दरम्यान, चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या जागा या धरणात बाधित होत आहेत. त्यांना योग्य तो मोबदला देऊन तांत्रिक बाबी तपासून कायदेशीर बाबींची पूर्तता करीत धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.