डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथे सुरू असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकपासून ते डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथपर्यंत असे तीन टप्प्यांत तीन गर्डर चढवण्यात येणार आहेत. हे काम रविवारी रात्री १२ पासून सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी केली आहे. यात कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर पर्यायी मार्ग काय आहेत, याबाबतच्या सूचना केल्या आहेत.
पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी १५ सप्टेंबर २०१९ पासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मोठी वाहतूककोंडी होऊन लोकांची गैरसोय होते. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. याच कालावधीत रेल्वे वाहतूक बंद असताना हा पूल पाडण्यात आला. तेव्हापासून येथील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळवण्यात आली आहे. कोपर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु आहे. या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याने हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे दावे केले जात आहेत.
दरम्यान, आता या पुलाच्या ठिकाणी तीन टप्प्यांत तीन गर्डर चढवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गर्डर घेउन येणारी क्रेन ही रस्त्याच्या आतील बाजूस उभी करून पुलाचे गर्डर चढवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावेळी येथील वाहतूक व्यवस्था बंद ठेवावी लागणार आहे.
पुलाचे काम सुरु असताना रस्त्यावर व परिसरात वाहतूककोंडी होऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी त्या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात वाहतूक विभागाने जाहीर केलेली अधिसूचना गर्डरचे काम होईपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, या काळात पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. ऐन सोमवारी, कामाच्या दिवशी येथील वाहतूक बंद राहणार असल्याने लोकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
वाहतुकीत असे आहेत बदलरामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना रामनगर रिक्षास्टॅण्ड या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने ही एस.व्ही. रोडवरून वृंदावन हॉटेलमार्गे उजवीकडे वळून बिर्याणी कॉर्नर येथून डावीकडे वळून पुढे एस.के. पाटील चौक मार्गे उजवीकडे वळून राजाजी पथ गल्ली क्रमांक १ मार्गे इच्छितस्थळी जातील. आयरे गाव, आयरे रोड डोंबिवली पूर्वेतील परिसरातून राजाजी पथ मार्गे रेल्वेस्थानक रामनगरकडे येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना राजाजी पथ गल्ली क्रमांक १ च्या कडेला प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने राजाजी पथ गल्ली क्र. १ मधून एस. के. पाटील चौकातून इच्छित स्थळी जातील.