कल्याण : आजी-आजोबांची आठवण आली, म्हणून एक सात वर्षांची मुलगी एकटीच लोकलमध्ये बसली, परंतु कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या बेपत्ता मुलीचा शोध लागला. रेल्वे स्थानकात निदर्शनास पडताच, चौकशीअंती तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री ९च्या सुमारास कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसाची नजर लोकलमधून उतरणाऱ्या एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून आहेत. ती मुलगी ट्रेनमधून उतरताच त्याने तिची विचारपूस केली. मात्र, मुलगी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना तिला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी वायरलेसद्वारे याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली.त्याच दरम्यान मुंब्रा पोलिसात काजल तिवारी (वय ७) ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली गेली होती. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी त्वरित दखल घेत मुलीचा शोध सुरू केला होता. अखेर कल्याण स्टेशनला रेल्वे पोलिसांना सापडलेली मुलगी ही काजलच असल्याचे चौकशीअंती पुढे आले. सोमवारी सकाळी तिला तिच्या मोठ्या बहिणीच्या तब्यात देण्यात आले.नातेवाइकांसोबत नेहमी ट्रेनने प्रवासकाजलचे आजी-आजोबा, आई, वडील हे अंबरनाथला राहतात, तर बहीण ही दिव्याला राहते. ती नेहमी अंबरनाथ आणि दिवा या दरम्यान नातेवाइकांसोबत ये-जा करते. रविवारी रात्री तिला आजी-आजोबांची आठवण झाली. त्यामुळे ती कशी तरी दिवा स्थानकात येऊन ट्रेनमध्ये बसली आणि कल्याण स्थानकात तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा शोध लागल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
चिमुरडी निघाली आजोबांच्या भेटीला! एकटीच बसली होती लोकलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 1:00 AM