डोंबिवली: ग्रोथ सेंटर मधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणा-या १० गावांना रस्ते आणि सुविधा द्या अन्यथा विरोध होईल. विकासाला विरोध नाही,फक्त प्राथमिकता ठरवा असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एमएमआरडीएला दिला आहे. रस्ते बिल्डरच्या फायदयासाठी बांधले जात आहेत का? असाही सवाल पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
एमएमआरडीएने कल्याण विकास केंद्र प्रकल्पांतर्गत उसरघर- निळजे - घेसर, निळजे - कोळे - हेदूटणे, हेदुटणे - माणगाव - भोपर आणि उसरघर - घारीवली या गावांना जोडणा-या चार रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामासाठी निविदा मागविल्या आहेत. उसरघर - निळजे - घेसर या कामासाठी १०७.१४कोटी, निळजे - कोळे - हेदुटणे आणि उसरघर - घारीवली या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १२३.४९ कोटी तसेच हेदुटणो - माणगाव - भोपर या कामासाठी ९५.९९ कोटी रूपये असा एकूण ३२६ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून निविदा काढल्या आहेत. मात्र याच कामावरून आमदार पाटील यांनी एमएमआरडीए प्रशासनाला इशारा देत ट्विट केले आहे.
हे रस्ते रूनवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले आहेत का ? असा सवाल त्यांनी केला आहे. ग्रोथ सेंटर मधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या १० गावांना रस्ते व सुविधा द्या, अन्यथा विरोध होणार असा इशारा पाटील यांनी दिला आहे. विकासाला विरोध नाही फक्त प्राथमिकता ठरवा याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान या इशा-याकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.