सचिन सागरे
कल्याण :
पंधरा मिनिटात तीन गणपती अंडरवॉटर काढण्याचा रेकॉर्ड करणाऱ्या कल्याणमधील कला शिक्षिका ललिता चव्हाण यांचा ‘ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सत्कार करण्यात आला. कला साधना संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. खारघर येथे रविवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ५८ जणांचा सत्कार करण्यात आला.
कला शिक्षिका असलेल्या ललिता एक अॅपस्ट्रॅक (अमूर्त) चित्रकार असण्याबरोबरच अंडरवॉटर रांगोळी आणि आर्टिस्टदेखील आहेत. कलेची आवड असलेल्या ललिता स्वतः ही कला जोपासत असून इतरांनाही कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून सतत प्रयत्न करत असतात. त्यांनी चित्रकला प्रदर्शन ही भरवले आहे. गेल्या आठ वर्षापासून त्या ड्रॉइंग क्लास घेत आहेत. कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून चित्रकला स्पर्धा घेऊन त्यात विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि कलेच्या साहित्याचे वाटप ही त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात मुलांचे मनोबल वाढवण्याबरोबरच आपल्याकडे असलेल्या कलेला इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मोफत चित्रकलेचे मार्गदर्शन केले. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला होता. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना कर्तुत्वान महिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात राजारवी वर्मा पुरस्कार, इंडियन आयडॉल स्टार अवार्ड २०२२ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ऑल इंडिया आर्ट टॅलेंटमध्ये त्यांच्या काही चित्रांची निवड करण्यात आली आहे. सासरच्या आणि माहेरच्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचल्याचे ललिता सांगतात.