कल्याण - वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन च्या वतीने चीनमध्ये झालेल्या हायको कप हैनान चीन ओपन २०२३ या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिने पुमसे या प्रकारात ४० वर्षा वरील महिला या गटात सुवर्णपदक पटकावले आहे.
कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे प्रशिक्षण वर्ग चालवणाऱ्या ज्योती पगारे हे नाव तायक्वांदो विश्वात फार जुने असून गेल्या ३० वर्ष त्यांनी या खेळासाठी दिली आहेत. हजारो खेळाडूंना त्या प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. चीन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधत्व केले आहे.
तसेच या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी महाराष्ट्राची पहिली महिला पुमसे खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेत दहा देशातील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता, यामध्ये ६० महिला खेळाडूचा सहभाग होता. त्यामध्ये भारताच्या ज्योती पगारे हिने यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.