कल्याण- नवीन कोपर पूल केव्हा खुला होणार? असा प्रश्न कल्याणडोंबिवलीकरांना वारंवार पडतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन कोपर पूल खुला होण्यासंदर्भात तारखा दिल्या जात होत्या. अखेर हा तारखांचा सिलसिला आता संपला असून गणेश चतुर्थी अगोदर कोपर पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या वृत्तास केडीएमसी प्रशासनानेही दुजोरा दिला आहे. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि शहराला पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा पूल खुला झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
18 सप्टेंबर 2018 रोजी कोपर पूल धोकादायक झाल्याचे सांगत रेल्वेकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एप्रिल 2020 मध्ये लॉकडाऊनचा योग्य उपयोग करत अल्प कालावधीतच कोपर पुलावर हातोडा मारण्यात आला. मात्र त्यानंतर कोरोना काळात इतर विविध अडचणी निर्माण झाल्याने कोपर पुलाचे काम लांबणीवर गेले. त्यामुळे कल्याणच्या पत्री पुलानंतर डोंबिवलीतील कोपर पूल हा चर्चेचा विषय झाला होता. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गणेश चतुर्थी अगोदर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी "लोकमत"शी बोलताना सांगीतले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपली असून सोयीप्रमाणे कोपर पूल आणि ठाकुर्ली उड्डाणपूलाचा वापर करणे शक्य होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या डोंबिवली पूर्व -पश्चिम प्रवास करण्यासाठी नागरिकांना एकमेव असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलावरून दोन किलोमीटरचा फेरा घ्यावा लागत आहे. यामुळे वेळ वाया जात असून मनस्तापही नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे कोपर पूल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली जात होती. पुलावर 21 गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेदेखील पूर्ण झाल्यातच जमा आहेत. आयुक्त सूर्यवंशी यांनी गणेश चतुर्थीच्या अगोदर पूल खुला होणार, असे सांगितले असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.