कल्याण- कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला नागरीकांचा कसा प्रतिसाद मिळतो. ते पाहून हा उपक्रम ठाणेपोलिस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यात सुरु करण्यात येईल असे ठाणे पोलीस आयुक्त आशूतोष डुंबरे यांनी येथे सांगितले.
ठाणे पोलीस आयुक्त डुंबरे यांच्या हस्ते आज सेल्फ हेल्प डेस्क या उपक्रमाचा लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी आयुक्त डुंबरे यांनी हे सांगितले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नंदन सभागृहात पोलीस दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि सुनिल कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त डुंबरे यांनी सांगितले की, नागरीकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. साधी लाईट सुद्धा गेली तर नागरीक पोलिसांना फोन करतो. नळाला पाणी आले नाही तरी फोन पोलीस ठाण्याला केला जातो. यातून हे समजते की, नागरिकांचा आजही पोलिसांवर विश्वास आहे की पोलीस समस्या सोडवू शकतात. सेल्फ हेल्प डेस्क हा उपक्रम स्तूत्य आहे. मात्र नागरीकांना त्याचा वापरही करता आला पाहिजे. सगळ्याच नागरीकांना ते जमणार नाही. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात जे स्वागतकक्ष सुरु केले आहे. त्याच्या शेजारीच सेल्फ हेल्प डेस्क ठेवावा. त्याचे ट्रेनिंग आधी पोलिसांना द्यावा. पोलीस मग नागरिकांना ते समजावून सांगतील. नागरीकांचा प्रतिसाद पाहून तो ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यात राबविला जाईल असे आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.
सेल्फ हेल्प डेस्क हा उपक्रम सुरु करण्यात यावी ही संकल्पना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची होती. या सेल्फे डेस्कच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची तक्रार, मोईल हरविल्याची तक्रार, ठाणे पोलीस आयुक्तालयाची माहिती, चारित्र्य पडताळणीचा अर्ज, पोलीस विभागाशी संबंधित तक्रारी नागरिकांना करता येणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी यावेळी दिली.