लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मी आणि माझे कुटुंब इतक्यापुरतेच राज्य सरकार मर्यादित आहे. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित, बाकीच्यांच्या सुरक्षिततेशी सरकारला देणे-घेणे नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी २० दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. केवळ एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. तू माझे काही काढू नको, मी तुझे काही काढणार नाही, अशी भूमिका तेथे घेतली जात आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी न होता वाढतच जाणार आहे. राज्य सरकारने मूग, तांदूळ, कडधान्ये यांचा सरकारी साठा करून ठेवला असता, तर भाववाढीवर नियंत्रण मिळवता आले असते. साठा केलेले धान्य स्वस्त दराने देता आले असते. मात्र, सरकारने त्या प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकारने लॉकडाऊन केले पाहिजे. मात्र, नागरिकांच्या खाण्याची सोय आणि खर्चाला लागणाऱ्या पैशांची सोय करावी. त्यानंतर, खुशाल कितीही दिवस लॉकडाऊन करावे, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे.समाजवादी आणि शिवसेना ही वेगवेगळी दिसत आहे. हा फरक राहणार आहे. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा केला होता. त्यामुळे जेव्हा बाबरी मशिदीचा प्रश्न चर्चेला येईल, तेव्हा समाजवादी आणि शिवसेनेत वेगळेपण दिसून येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.