कल्याण- अफजल खानाच्या वधाचा बॅनर सरकारने काढला. त्यांचा बाप लागतो का तो ? पोलीस प्रशासनाने जाऊन मुख्यमंत्र्यांना ,सरकारला विचारा अफजलखान आमचा काका मामा लागतो का ? ज्याने आमच्या आया बहिणी पळवल्या आणि मळवल्या तो कोण लागतो? हा शिवरायांचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी काल कल्याणात केली.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षां पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेच्या समारोपा निमित्त आयोजित सभेत गायकर यांनी ही टिका केली. यावेळी गायकर यांनी शिंदे फडणवीस सरकारसह पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.
गायकर यांनी सांगितले की, अफजल खानाच्या वधाचे बॅनर लावणे हा काही गंभीर गुन्हा नाही. त्यामुळे ज्या अधिका-यांनी ही कारवाई केली. त्याची सरकारने गांभीर्याने विचारणा केली पाहिजे. बॅनरच्या माध्यमातून इतिहास जागवण्याचे काम बजरंग दलाने केले आहे. अफजल खानाचे या सरकारशी काय नातेआहे? असा सवाल उपस्थित करत अफजल खानाचा वध केला आहे म्हणूनच वाघ नख आणली जात आहेत. कारण वाघ नख ही शौर्याचे प्रतीक आहेत. बॅनर लावणे गुन्हा असेल तर मग वाघनखं कशाला आणता? असा उपरोधिक सवाल गायकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नवरात्री उत्सवाच्या साधनेत अन्य धर्मीयांनी येण्याचे कारणच नाही. हा सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा. यायचेच असेल तर त्यांच्या बुरखाधरी भगिनी घेऊन याव्यात आम्ही त्यांचा सन्मान करू. आम्हाला मुसलमान हिंदू करायचाचे नाही. पण केवळ इथे येऊन या सणाला गालबोट लावणे. या सणाला कुठेतरी वाईट दिशेला नेणे आणि हिंदूंची संस्कृती संपवण्याचा जो खुळचटपणा चाललेला आहे. तो बंद झाला पाहिजे म्हणून बजरंग दलाने अनेक ठिकाणी त्याला विरोध सुद्धा केलेला आहे. या वेळी बोलताना गायकर यांनी संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता टीका केली आहे. ते काय म्हणतात याहीपेक्षा आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेलो आहोत हे महत्वाचे आहे याकडे गायकर यांनी लक्ष वेधले.