कल्याण - शहराच्या पश्चिम भागतील फडके मैदानाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाची निविदा काढण्या आधीच ठेकेदाराने काम सुरु केले आहे. या प्रकरणी मनसेने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास जाब विचारल्याने महापालिका प्रशासनाने काम सुरु करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. काम सुरु करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
फडके मैदानाच्या देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाची निविदा प्रस्तावित होती. ही निविदा काढली जाणार होती. ही निविदा ७५ लाख रुपये खर्चाची आहे. मात्र शिक्षक मतदार संघाची निवडणूक असल्यानेमुळे आचारसंहिता लागू होती. आचार संहितेमुळे या विकास कामाची निविदा काढण्यात आलेली नव्हती. निविदा काढलेली नसताना मनसेचे पदाधिकारी गणेश लांडगे यांनी प्रशासनाकडे या प्रकरणी तक्रार केली.
या तक्रारीची कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. निविदा काढलेली नसताना काम सुरु करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या प्रकरणी महापालिका मुख्यालयात घाव घेतली. निविदा काढलेली नसताना काम कशाच्या आधारे सुरु केले असा सवाल उपस्थित केला.
प्रशासनाला या प्रकरणी जाब विचारला असून महापालिकेत अनेक विकास कामे रखडलेली आहे. त्या विकास कामांच्याही निविदा काढण्याऐवजी कामे सुरु करावीत, असा उपरोधिक सल्ला प्रशासनाला दिला आहे.