- मुरलीधर भवारलाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद २०१५ पासून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम उपक्रम आणि नगरविकास खातेही त्यांच्याकडे होते. मात्र, पालकमंत्री म्हणून शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याकडे जास्त लक्ष होते. आताही आहे. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पालकमंत्रिपदाची धुरा मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सोपविली. देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
दोन ठिकाणचे पालकमंत्रिपद सांभाळताना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागते. सप्टेंबर २०२२ मध्ये देसाई यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेेले नाहीत. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पदाधिकारी आता पालकमंत्री हरविल्याची टीका करत आहेत.
पालकमंत्र्यांचा एकही दौरा नाहीठाणे जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा एकही दौरा झालेला नाही. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतात. त्यामध्ये त्यांनी काही प्रकरणात काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
चार महिन्यांत कोणत्या मंत्र्यांचे किती दौरे?केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे दोन वेळा ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभेची जबाबदारी दिली आहे. तिसरा दौराही अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक वेळा ठाणे जिल्ह्यात विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले. तसेच नवरात्र उत्सव आणि अन्य समारंभात उपस्थित राहिले आहेत.उद्योग मंत्री उदय सामंत हे एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीत आले होते. तसेच त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण ग्रामीणमधील पाणीचोरी पकडण्याकरिता धाड टाकली होती. मंत्रालयात २७ गावांच्या पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती.
ठाणे जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा दौरा होणे अपेक्षित आहे. मात्र, दौरा झालेला नाही. दौरा करण्यात यावा, यासाठी लेखी मागणी केली होती. -प्रेमनाथ म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष, कल्याण.
जिल्ह्यात पालकमंत्र्यांचे दौरे किती झाले, याची माहिती घेऊन सांगतो. मात्र, पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतात. -गोपाळ लांडगे, जिल्हाध्यक्ष, शिंदे गट