मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण - डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी कारवाई करताना एका फेरीवाल्यास मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल या फेरीवाला संघटनेने केला होता. उपायुक्त तावडे यांना या प्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करावे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आजपासून पथारी सुरक्षा दलाने उपोषण सुरु केले आहे.
पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी लहू गायकवाड, अमोल केंजळे, सदाभाऊ टाकळकर, मनिषा टाकळकर आदी फेरीवाले उपोषणाला बसले आहेत. फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडलाने दुपारी मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेतली. उपायुक्त तावडे यांनी फेरीवाल्यास कारवाई दरम्यान मारहाण केली. त्याच्या विक्री मालाचे नुकसान केले. तावडेंच्या विरोधात निलंबनाची कारवाई करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उपायुक्त गुळवे यांच्याकडून फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडळाचे समाधान न झाल्याने त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलेले नाही. जोपर्यंत तावडे यांच्या विरेधात कारवाई केली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला हाेता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टा’ल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली. त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली. त्याच्या मालाची नासधूस केली. या घटनेनंतर तावडे यांनी त्यांच्याकडून कारवाई दरम्यान कुरेशीला मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे.