- मुरलीधर भवारकल्याण - स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विठ्ठल मिसाळ असे आहे. ताे मूळचा बीडचा रहिवासी आहे. या घटनेची नाेंद महात्मा फुले पाेलिसांनी केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाेलिस त्याने आत्महत्या का केली असावी या कारणाचा शाेध घेत आहेत.
स्टेशन परिसराच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. त्यामुळे स्टेशनवर वाहनांची वर्दळ असते. आज पहाटेच्या सुमारास एक तरुण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. काही मंडळींनी त्याचा व्हीडीआे काढून या घटनेची माहिती तात्काळ पाेलिस आणि अग्नीशमन दलास दिली. पाेलिस आणि अग्नीशमन दलाचे जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा लटकलेला मृतदेह खाली उतरविला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला आहे.
आत्महत्या करणारा तरुण हा मूळचा बीडचा रहिवासी आहे. तर ताे कल्याणला काेणत्या कारणास्तव आला हाेता. त्याला कुटुंबियांचे टेन्शन हाेते का की ताे कामाच्या शाेधात कल्याणला आला हाेता. त्याच्या हाताला काम न मिळाल्याने त्याने वैफल्यग्रस्त हाेऊन आत्महत्या केली असावी आदी विविध अंगाने पाेलिस त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा शाेध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कल्याण स्टेशन हे रेल्वेचे जंक्शन आहे. या स्टेशनात राज्यातून आणि परराज्यातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येत असतात. तसेच स्टेशन परिसरात फिरस्त्यांचा वापर जास्त असताे.