कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या वतीने नदीपात्रात सुरु असलेल्या आंदोलनास भेट न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी निषेध केला आहे.संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्या पुढाकाराने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर आणि कैलास शिंदे हे आंदोलन करीत आहे. हे आंदोलन दिवसरात्र नदीपात्रात सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकरणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या प्रकरणी काय तोडगा काढता येईल याविषयी विचारणा केली. त्यावर अधिकारी त्याठिकाणी येणार नाही. चर्चेकरिता आंदोलन करणाऱ्यांनी महापालिकेत यावे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. या उत्तराने शिंदे संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला न येणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त केला. महापालिकेस शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आता १५ फेब्रुवारी रोजी शिंदे शहर अभियंत्याना भेटून या संदर्भात चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आयुक्तांचीही भेट मंगळवारी घेणार आहेत. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन तूर्तास तरी सुटण्याचा काही एक मार्ग नाही. आंदोलन करणाऱ्यांनीही ठोस उपाययोजना केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आंदोलकांची साधी भेटही न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:36 AM