डोंबिवली: एटीएममध्ये आलेल्याला बोलण्यात गुंतवत नकळतपणे त्याच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदल करून त्याच्या बँक खात्यातील रोकड लांबविणा-या भामटयाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सनी मुन्ना सिंग ( वय २८ ) रा. विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व असे अटक आरोपीचे नाव आहे.
पुर्वेकडील टिळकनगर भागात राहणा-या नम्रता जोशी या शहीद भगतसिंग रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवुन त्यांच्याकडील एटीएम कार्डची त्यांच्या नकळत अदलाबदली केली आणि जोशी यांच्या खात्यातील १५ हजार रूपयांची रोकड काढून तो पसार झाला. हा फसवणुकीचा प्रकार २ ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता घडला होता. याप्रकरणी जोशी यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे यांच्या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करून या गुन्हयातील सनी सिंग याला बेडया ठोकल्या. त्याच्याकडून १० हजारांची रोकड जप्त केली आहे.
आठ गुन्हे दाखल
एटीएम बदली करून फसवणूक करण्यामध्ये तो सराईत आरोपी आहे. सखोल तपास करता त्याच्याविरूध्द मुंबईमधील भोईवाडा, पुणे येथील हडपसर, जळगांव येथील जिल्हापेठ, ठाणे येथील नारपोली, कोळशेवाडी, श्रीनगर, बदलापूर, विष्णुनगर अशा विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.