डोंबिवली: पुर्वेकडील भागातील तीन जैन मंदिरांमधील चांदीच्या वस्तू चोरणा-या अट्टल चोरटयाला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. नरेश अगरचंद जैन ( वय ४७ ) रा. खेतवाडी, मुंबई असे अटक आरोपीचे नाव आहे. मंदिरांमध्ये दर्शनाच्या निमित्ताने तो प्रवेश करायचा आणि तेथील चांदिच्या वस्तू लांबवायचा. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गुन्हा घडल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे.
१६ जानेवारीला सकाळी १० ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान पुर्वेकडील आदिनाथ गृह जिनालय, पार्श्वगज जैन संघ चॅरीटेबल ट्रस्ट मंदिर आणि शांतीलाल जैन मंदिर अशा तीन मंदिरांमध्ये चोरीचा प्रकार दिवसाढवळया घडला होता. यात एकूण ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. दरम्यान याप्रकरणी शनिवारी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते, पोलिस निरिक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सुनील भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, पोलिस नाईक हनुमंत कोळेेकर, शिवाजी राठोड यांचे पथक नेमले होते. चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नरेश जैन यास रविवारी पहाटे ५.३० वाजता अटक केली. त्याच्याकडून ८० हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी नरेश हा जैन मंदिरांमध्ये चो-या करणारा अट्टल चोरटा आहे. पूजा करताना जी वस्त्रे परिधान केली जातात तशी वस्त्रे घालून तो मंदिरात दर्शन करण्याच्या निमित्ताने प्रवेश करायचा. त्याच्याविरोधात मुंबईमधील काळाचौकी, एलटी मार्ग, शीव, आग्रीपाडा, आझाद मैदान, मलबार हिल, घाटकोपर, डी एन नगर आणि बोरीवली पोलिस ठाणे अशा ९ पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक गिते यांनी दिली.