प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून लुबाडणारा भामटा विजय दत्ताराम तांबे ( वय ५५) रा. शेलारगाव, भिवंडी. हा मी आमदार राजू पाटील यांचा भाचा असल्याची बतावणी करत लुटायचा. तांबे विरोधात ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहीती विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांनी दिली. तांबे ने त्याच्या साथीदारासह कल्याण, भिवंडी, ठाणे व मुंबई येथे नागरिकांना बतावणी करीत गंडा घातला असल्याचे पवार म्हणाले.
डोंबिवली पुर्वेकडील रेल्वे ग्राउंड जवळ राहणारे गणेश कुबल हे ७५ वर्षीय गृहस्थ २८ जूनला दुपारी पावणेदोनच्या सुमारास महात्मा गांधी रोडवरील एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथून बाहेर पडल्यावर गोपी मॉलजवळ एक ५० वर्षीय अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि खुप जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागली. तुम्ही कोण मी ओळखत नाही असे कुबल यांनी सांगितल्यावर, माझेकडे नीट बघा असे वारंवार तो बोलू लागला. मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. तुम्ही मिटींगला डोंबिवली पश्चिमेला भेटला होतात. तिथे तुम्ही आला होतात अशी बतावणी करीत त्या व्यक्तीने कुबल यांच्याकडील रोकड आणि सोन्याची चेन असा ६० हजारांचा मुद्देमाल हातचलाखीने चोरून नेला.
याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास करताना सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन लोखंडे आणि पोलिस उपनिरिक्षक दिपविजय भवर यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या आधारे संबंधित भामटा विजय तांबेला पोलिसांनी नवी मुंबईतील खारघर येथून बेडया ठोकल्या आहेत.
तांबेला असाध्य आजार आहे. त्या आजाराचे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे. न्यायालयात तो ते प्रमाणपत्र दाखवून सहानुभूती मिळवतो. न्यायालयाकडून जामिन मिळवतो. जामिनावर सुटून आला की पुन्हा लोकांना गंडा घालण्याचे काम करतो. आतापर्यंत त्याने ५० हून अधिक लोकांना गंडा घातला आहे. महत्वाचे म्हणजे तांबेला जेव्हा अटक केली तेव्हा त्याने दोन तास आधी दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटले होते.