अनिकेत घमंडी/ सचिन सागरे/ प्रज्ञा म्हात्रे
अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणडोंबिवली शहरांना पावसाने झोडपले. आधी सोसाट्याचा वारा, धूळ आणि काळोख झाला, त्यामुळे जोरदार पाऊस येणार असल्याने पादचारी, दुकानदार, भाजी बाजार यांमध्ये धावपळ झाली, आणि तेवढ्यात पाऊस आला. पावणे चार पर्यंत वारा आणि पावसाच्या सरी पडल्या, त्यानंतर मात्र वातावरण शांत झाले, पावसाची जोरदार सर ओसरली असली तरी पाऊस मात्र सुरूच होता.
पूर्वेला सोमवार असल्याने शहरातील फडके पथ, मानपाडा रस्ता येथील बाजार पेठेत दुकाने बंद असल्याने आणि दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती, परंतु पश्चिमेला बाजारपेठ असल्याने तेथे मात्र दुकानदार, भाजी विक्रेते आदींची।धावपळ।झाली. काही प्रमाणात मालाचे नुकसान झाले. रेल्वे स्थानक परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने पंचाईत झाली.
मुंबईतही पावसाची हजेरी
सध्याकाळी ४ च्या सुमारास मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला वादळी वाराही सुटला होता. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात दुपारी तीन वाजल्यापासून वादळी वारे सुटले होते आणि पावणेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यांसह हा पाऊस सुरू असून काही भागांत वीज गेली आहे.दरम्यान, हवामान खात्यानं काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता. बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊसाची सुरूवात झाली असून वाऱ्याचा वेग १०७ किमी इतका असल्याचं म्हटलं जातंय.
कल्याणमध्येही पाऊस
कल्याण : कल्याण शहरात दुपारी साडे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांची धांदल उडाली. काहींनी रेनकोट, छत्री घेऊन तर काहींनी भिजून या पावसाचा आनंद घेतला.