मुरलीधर भवार, कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील मुस्लीम बहुल वस्तीतील मौलवी कपाऊंड येथील अतिधोकादायक इमारतीचा सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्नीशमन दल आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक इमारतील नागरीकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मौलवी कंपाऊंड ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीला महापालिकेने यापूर्वीच नोटीस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक या स्वरुपाची आहे. या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश लोक भाडेकरु आहेत. या इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्य चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मीया या जखमी झाल्या. मेहरुनिया या तस्मिया हिला शाळेत घेऊन निघाल्या होता. सज्जाचा भाग त्यांच्या अंगावर पडला. त्यात तस्मिया हिच्या पायाला दुखापात झाली आहे. तर मेहरुनिसा हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, सहाय्यक आयुक्त सविता हिले, प्रिती गाडे, आयुक्तांचे सचिव उमेश यमगर आदींनी त्याठिकाणी धाव घेतली.
उपायुक्त जाधव यांनी सांगितले की, इमारतीचा सज्जा कोसळला आहे. ही इमारत धोकादायक आहे. या ठिकाणच्या ७५ कुटुंबियांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांना भोगवाटा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.