कल्याण : कल्याण- डोंबिवली शहरात कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील राजकारण नेहमीच रंजक आणि चर्चेत राहिले आहे. सेना विरुद्ध भाजप हा कलगीतुरा नेहमीच या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो.कल्याण पूर्वेत आमदारांनी आतापर्यंत काय विकासकामे केली? असा प्रश्न विचारून लोकांची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा हिशेब आपण आगामी केडीएमसी निवडणुकीत चुकता करणार असल्याचा पलटवार आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवलीतील 'निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन' या पत्रकारांच्या संघटनेसोबत आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आदी प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला. पुढे ते म्हणाले की, कल्याण पूर्वेतील जनतेने सलग 3 वेळा निवडून देत आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपण पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी कल्याण पूर्वेतील परिस्थिती अतिशय बिकट अशी होती. मात्र आपण निवडून आल्यापासून इथल्या नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत. मात्र याठिकाणी शिवसेनेकडून होत असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आपल्या अनेक चांगल्या विकासकामांना गती मिळू शकली नाही. हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.आगामी केडीएमसी निवडणुकीत विरोधकांना आपण त्यांचे सर्व हिशेब चुकते करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला.
गायकवाड यांनी निधी आणला मग ती कामं होऊ द्यायची नाही अशी इकडे मानसिकता झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे विकासासाठी वरिष्ठ नेते एकमेकांतील सर्व मतभेद विसरून एकत्र येतात त्याप्रमाणे कल्याण पूर्वेच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आमदार गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखवली. तर आगामी केडीएमसी निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेनेसोबत युती ही भाजपची सर्वात मोठी चूक असल्याचे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले
'सत्ताधाऱ्यांची विकासकामे करण्याची मानसिकता नाही'गेल्या 7 वर्षांपासून खासदारही शिवसेनेचा आहे. 10 वर्षांपासून इकडे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची विकासकामे करण्याची मानसिकता नाही आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाने आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचा गौप्यस्फोटही गायकवाड यांनी केला आहे.