लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
कल्याण येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय येथे गुलाबराव पंडितराव पाटील मागील पंचवीस वर्षापासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीची दखल घेत महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ओरिसा स्टेट आणि नीती आयोग पुरस्कृत कोरोना योद्धा व मानद डॉक्टरेट पदवी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आर. एस. पी.महासमादेशक महाराष्ट्र राज्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
पाटील हे शालेय, सहशालेय उपक्रमातून अष्टपैलू विद्यार्थी घडविणे, आजी-आजोबा स्नेहमेळावा, बाल जत्रा, कैदी बांधवांना राखी बांधून सीमेवरील जवानांना राख्या पाठवणे, झाडांचा वाढदिवस साजरा करणे शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पालक व विद्यार्थ्यांकरता राबवत असतात. उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणूनही त्यांची ओळख आहे.