डोंबिवली - मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत कल्याण डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने शहिद कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे मातीला नमन, विरांना वंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहिद सैनिक कुटुंबीय, सेवानिृत्त सैनिक व पोलीस यांचा बुधवारी सन्मान करण्यात आला.
यामध्ये शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांचे आई, वडील सुधा राजा सचान, २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अरूण चित्ते यांची मुलगी खुशी चित्ते, सेवानिवृत्त ब्रिगेडियर आनंद ठाकूर, पद्मश्री गजानन माने, स्क्वाड्रन लीडर नीतू थापलीयाल, मेजर. शलिल शिंदे, मेजर विनय दगावकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील काळे, सपोनि अर्दालकर, रिटायर्ड सैन्यातील हवालदार बाजीराव पाटील, यांचा कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, यांनी देशासाठी शहीद होणारे वीर, त्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त सैनिक, सेवानिृत्त पोलीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक देशवासीयाने आपल्या देशाची सेवा करणाऱ्या या सैनिकांप्रती अभिमान बाळगला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपस्थित मान्यवर रिटायर्ड ब्रिगेडियर आनंद ठाकूर यांनी डोंबिवली मधील तरुणांनी देखील सैन्यात सामील होऊन देशसेवा करावी असा मनोदय व्यक्त केला.
पद्मश्री माननीय गजानन माने यांनी देखील विद्यार्थ्यांना उद्देशून तरुणांची देशाप्रति असणारी भावना अशीच प्रज्वलित राहावी यासाठी आशा उपक्रमास प्राधान्य द्यावे व देशभक्त सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल कल्याण वाहतूक विभागाचे मनस्वी आभार मानले. ओमकार स्कूल व सेंट जॉन स्कूल,डोंबिवली पूर्व येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ बँड वादन करीत शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी शएसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, दत्तात्रय बोराटे, मोहन खंदारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शिरीष देशपांडे, ॲड.शशांक देशपांडे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उप विभाग उमेश गित्ते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी पंचप्राण शपथ व राष्ट्रगीताने केली